आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी नोंद विद्यार्थी
'डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन' आणि 'स्पेस झोन ऑफ इंडिया' द्वारा आयोजित "स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१" या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा शंभर पेलोड उपग्रह हेलिअम बलूनद्वारे बनवून अवकाशात नेण्याचा त्यांचा प्रकल्प होता. हा प्रकल्प ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथे पार पाडला गेला. हा उपक्रम डॉ. ए.पी.जे कलाम कुटुंबियांद्वारे राबविला जातो. विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनात रुची निर्माण व्हायला हवी. भविष्यात त्यांनी हे क्षेत्रही निवडले पाहिजेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
![]() |
| रानशेत आश्रमशाळेतील अंजु कमलाकर भोईर सहभागी विद्यार्थिनी |
उपग्रह म्हणजे काय? तो नेमका कसा बनवला जातो? त्याचे विविध भाग कोणते? आणि त्याचं नेमकं कार्य काय? हेलिअम बलून म्हणजे काय? तो सेन्स कसा करणार आहे? या सर्व बाबींचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रह बनवून आणि त्यांना पस्तीस हजार ते अडतीस हजार मीटर उंचीवर 'हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलून' द्वारे स्थापित केले जाईल. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केससोबत पॅराशूट, जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साइड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब ही सगळी माहिती तो उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवेन. कृषी विभागास अवकाशातील शेती संशोधन याविषयावर सखोल संशोधन व्हावं यासाठी त्यांनी काही झाडांची बीजे पेलोड उपग्रहासोबत अंतराळात पाठवण्यात आलेले.
![]() |
| गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना |
१९ जानेवारी २०२१ रोजी पुण्याच्या हडपसर येथील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात उपग्रहाच्या प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पात रानशेत आश्रमशाळा, तलासरीची प्रयोगशील शाळा आणि इतर शाळांतील विद्यार्थी सहभागी होते. आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांचा अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेणे म्हणजे कौतुकास्पदच. हा उपक्रम त्यांच्यासाठी चांगली पर्वणीच ठरली आहे. देशभरातून एकूण एक हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. दहा विद्यार्थ्यांचा गट करून एक उपग्रह बनवायचा असा तो उपक्रम. विद्यार्थ्यांचे गट निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात चर्चा, त्यांची विचार क्षमता या साऱ्या गोष्टी घडल्या.
![]() |
| प्रयोगशील शाळा जि.प. आरजपाडा येथील सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग |
शंभर पेलोड उपग्रह या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील एकोणतीस विद्यार्थ्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यासोबतच आशिया आणि इंडिया विक्रम यातही विक्रमी नोंद झाली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, कलाम यांच्यावरील पुस्तिका, स्पेस ट्रॉफी देऊन सन्मानित केले. आदिवासी भागातील विद्यार्थी अशा उपक्रमात सहभागी होत असल्याचे पाहून आनंद होत आहे.
- शैलेश दिनकर पाटील



छान आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त ही बातमी वाचायला मिळाली. त्या मुलांना इतकी छान संधी मिळाली त्याचाही खूप अप्रूप आहे. तुझे शब्दांकन छान आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती
उत्तर द्याहटवा