पराक्रमी बिरसा

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक लढले. भारतात विविध ठिकाणी उठावही झाले. हे सारे सुरू असताना आदिवासी बांधवांचेही छोटमोठे उठाव सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बिरसा मुंडा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. बिरसा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ साली झारखंडच्या रांची येथील उलीहातू गावात झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कुलमध्ये झाले. त्यांनी तरुण वयात अनेक समविचारी मित्रांना एकत्र केलं. आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारासाठी आपण इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक तरुणांना संघटित केले. 

बिरसा मुंडा

संघटन करून उलगुलानची घोषणा केली. उलगुलान म्हणजे प्रचंड उलथापालथ, हल्लाबोल. शोषणाविरुद्ध, स्वतःच्या हक्कासाठी, खोट्या आरोपांच्या विरुद्ध उलगुलान, उलगुलान, उलगुलान... अशी ही उद्घोषणा.

आदिवासी साहित्यात मुंडारी बोलीत बिरसा यांच्या पराक्रमाविषयी एक गीत लिहिलेले आहे.

कैसा लियो हिंदुस्थान रे बिरसा

कैसा लियो हिंदुस्थान ।।धृ।।

बिरसा के हाथो में दो दो बंदूक थे ।

बिरसा के हाथो में दो दो तलवार थे ।

कमठे पे चढा दियो तीर नावे बिरसा रे ।

कैसा लियो हिंदुस्थान ।

हे वाचलं की स्फुरण चढते. अशोक शरण यांनी बिरसा यांच्या शौर्यावर 'उलगुलान-दि क्रांती' हा हिंदी चित्रपट तयार केला आहे.


जबरदस्तीने केलेले धर्मांतरण, शेतकऱ्यांचा केलेला अतोनात छळ या सगळ्यांविरुद्ध बिरसा यांनी अगदी बुद्धिनिशी शह दिला. बिरसा यांना अवघ्या पंचविसाव्या वर्षी इंग्रजांनी अटक केली. तुरुंगात त्यांचा खूप छळ केला गेला. ०९ जून १९०० ला रांचीच्या कारागृहात मृत्यू झाला. पण ब्रिटिशांनी त्यांचा मृत्यू एका आजाराने झाल्याचे सांगितले. बिरसा यांच्या कार्यकर्तृत्वाने समस्त आदिवासी बांधवांनी त्यांना जननायक पदवी बहाल केली. बिरसा यांची जयंती आता प्रत्येक आदिवासी भागांतील शाळांमध्ये साजरी होते. शाळेतील विद्यार्थी भाषणांतून त्यांचे कार्य मांडत असतात. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बिरसा यांनी वंदन करूनच मिरवणूक काढली जाते.

बिरसा गेले पण त्यांचे नाव आजतागायत मुखात आहे. भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटचा नारा 'बिरसा मुंडा की जय' असा आहे. बिहारमध्ये काही शाळा आणि संस्थांनादेखील बिरसा यांचे नाव देण्यात आले आहे. असे हे पराक्रमी बिरसा!


© शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"