सामाजिक कार्यकर्त्या प्रिया जाधव
सोशल मीडिया फार प्रभावी माध्यम आहे. तेथे बऱ्याच अनोळखी व्यक्तींशी परिचय होतो. त्यांतील काही माणसांच्या कामाचा आवाका प्रचंड असतो. भांडुपच्या प्रिया जाधव यांचे कामही तसेच काहीसे आहे. फेसबुकवर आमचा परिचय झाला. दोन-तीन वेळा सामाजिक उपक्रमानिमित्त बोलणं झालेलं. प्रिया जाधव ह्या मूळच्या भांडुपच्या त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण भांडुप येथेच झाले. समाजासाठी काम करताना त्यांच्या समस्या किंवा लागणारी मदत गरजूंपर्यंत कशी पोहचू शकते या सगळ्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. २०१२ पासून त्यांनी कल्याण, ठाणे, मुंबई येथील अनेक संस्थांसोबत काम केले. महिला दिनाच्या निमित्ताने उद्योगांबाबत मार्गदर्शन, महिलांच्या समस्या इत्यादी कामांचा अनुभव त्यांनी घेतला. ही सगळी कामं करताना ती प्रामाणिकपणे करता येतील का? येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो का? याचा सारासार विचार करून समाजकार्याचा वसा त्यांनी हाती घेतला. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींसाठी पुढे सरसावून त्यांना मदत करण्याचे ठरवले.
![]() |
| प्रिया जाधव |
२०१७ साली प्रणय सावंत, प्रिया जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन 'देवामृत फाउंडेशन' संस्था सुरू केली. सामाजिक संस्थेत कामाचा अनुभव पाहता आणि महिलेने नेतृत्व करावे म्हणून प्रिया जाधव यांच्याकडे संस्थेची जबाबदारी सोपवली. शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक स्तरावर ही संस्था काम करते. देवामृत संस्थेने सोलापूरच्या स्नेहग्राम संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य देऊ केले आहे. २०१९ साली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या संगीत शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ त्यांनी केला. जे विद्यार्थी कलेत पारंगत आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे काही करता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. तलासरी सारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मुरबाड येथील आजीबाईंच्या शाळेला भेट देऊन आजींशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर गायलेल्या गाण्यांमुळे घराघरात पोचलेल्या कडूबाई खरात यांची औरंगाबाद येथे प्रिया जाधव यांनी भेट घेतली. त्यांची परिस्थिती पाहून त्यांना सहकार्य केले शिवाय या मधुर वाणीतून एक उत्तम गायिका बनून स्वतः आत्मनिर्भर कसे बनू शकता याची जाणीव त्यांना करून दिली. कडूबाई यांना एक स्टुडिओने गायनाचे पैसे कमी देऊ केले त्याविषयीही प्रिया यांनी सातत्याने पाठपुरावा करून कडूबाई यांना गायनाची योग्य ती रक्कम मिळवून दिली.
तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांकडे समाज अजूनही तुच्छतेने पाहतो. अशा माणसांसाठी देखील प्रिया यांनी काम केले आहे. त्यांनी भांडुप येथील शोभा अम्मांशी संवाद साधला त्यांच्याकडून तृतीयपंथ्यांची व्यथा समजून घेतली. कोरोनाकाळात त्यांचेही हाल झाले होते. अशा परिस्थितीत त्यांना जीवनावश्यक वस्तू देऊ केल्या. या मदतीचा आनंद म्हणून तृतीयपंथांनी २०२०च्या गणेशोत्सवात प्रिया यांना आरतीचा मान देऊन आमंत्रित केले. देहविक्री करणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून त्यांनी स्वावलंबी बनले पाहिजे. त्यासाठीही त्यांचा सक्रिय प्रयत्न सुरू आहे. 'सन्मान तुझ्या स्त्रीत्वाचा' अशी टॅगलाईन ठेऊन हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांना उपजिविकेचे अन्य साधन उपलब्ध व्हावे तसेच समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे. हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. मकरसंक्रांतीला देखील असाच समारंभ देवामृतच्या वतीने भांडुप येथे आयोजित करण्यात आला होता. मुंबईत काही कामानिमित्त प्रिया यांचे जाणे झाले त्या दरम्यान त्यांना फुटपाथवर वय वर्ष पंच्याहत्तर असलेल्या आजीबाई दिसलेल्या. आजीबाईंची अवस्था फारच बिकट दिसत होती. त्यांची सगळी स्थिती प्रिया यांनी समजून घेतली आणि अनाथ झालेल्या त्या आजींना योग्य ठिकाणी पोचविण्याच्या व्यवस्थेला सुरवात केली. दोनेक दिवस त्यांनी आजींच्या जेवणाची आणि त्यांना कपडे पुरवण्याची व्यवस्था केली. पण ते त्यांच्या मनाला रुचत नव्हते. आजींच्या घरचा पत्ता मिळाला पण त्यांच्या घरचे आजींना घ्यायला तयार नव्हते. निराधार आजींना न्याय मिळावा म्हणून त्यांनी दहा दिवस प्रयत्न केले त्यात मुंबईत कोरोना सारखी परिस्थिती सुरू होती. दवाखान्यात जाऊन आजींचे सगळे रिपोर्ट काढले. सुदैवाने आजी निरोगी होत्या. आजींची पुढची व्यवस्था त्यांनी पुण्याच्या एका वृद्धाश्रमात केली. पंधरा दिवस सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले.


Apratim lekh....shaileshji tum aage badho hum tushar sath hai
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाशैलेशजी आपली लेखणी दिवसेंदिवस अशीच वृद्धिंगत होत जावो!आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा