गुजरात येथील १६१ वर्ष जुनी मराठी शाळा
उंबरगाव येथे रविवारच्या बाजारात आलो असताना 'मराठी मिश्र शाळा' या नावाचा फलक नजरेसमोर आला. गुजरातसारख्या शहरात(उंबरगाव) जिल्हा परिषदेची मराठी शाळा? याविषयी मला जरा कुतूहलच वाटले. शाळेचे संपूर्ण बांधकाम दगडी. शाळेची स्थापना १८६० सालची म्हणजे तब्बल १६१ वर्ष जुनी शाळा. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे गेटला कुलूप लावले होते. आज कामानिमित्त तेथे जाणे झाले तेव्हा तिथल्या शाळेला भेट दिली. मुख्याध्यापिका सुर्वे मॅडम यांच्याशी शाळेविषयी चर्चा करत होतो. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. सुर्वे मॅडम सांगत होत्या, वलसाड जिल्ह्यात फक्त दोनच मराठी शाळा आहेत. एक उंबरगाव आणि दुसरी सारिगाम येथे. त्यात उंबरगाव येथील शाळा खूप जुनी. तेथे मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या चार भाषांचे विषय सक्तीचे आहेत. अभ्यासक्रमात इयत्ता तिसरी पासून गुजराती हा भाषा विषय आहे पण विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली आणि दुसरीतच त्या भाषेची गोडी लावली जाते. सोबत मराठी भाषादेखील असतेच. चारही भाषांची शिकवण असल्यामुळे माध्यमिकमध्ये प्रवेश घेताना फारशी अडचण येत नाही.
![]() |
| शाळा |
शाळेबरोबर कागदोपत्री व्यवहार गुजराती भाषेतच होतो. तेथील मुख्याध्यापिका सांगत होत्या शाळा स्थापन झाली(१८६०) त्यावेळी सगळ्या नोंदी मोडी लिपीमध्ये होत्या. उंबरगाव जोवर महाराष्ट्रात होतं तोवर मराठीत व्यवहार झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान उंबरगाव गुजरात राज्याला देण्यात आलं. त्यासोबत शाळादेखील गुजरातला जोडली गेली. शाळेच्या बाहेरील भिंतीवर भित्तिचित्रे काढण्यात आली होती. त्या चित्रांवर "साबणाने हात धुवा, जीवनातून रोग मिटवा" या आशयाची घोषवाक्ये त्यासोबतच लहान मुलांचे चित्र होते. उंबरगाव नगरपालिकेने इतर ठिकाणी सूचना देण्यासाठी गुजराती भाषेचा वापर केला आहे. त्यात काहीच गैर नाही त्यांच्या राज्यात त्यांच्याच भाषेचा वापर होईल. पण मला विशेष याचे वाटते की त्यांनी शाळेच्या आवारात मराठी भाषेचाच वापर केला. हे मात्र कौतुकास्पद वाटलं. शाळेच्या आवारात बऱ्याच जुन्या वास्तूदेखील आहेत.
- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा