पुस्तक परिचय - रानबखर
मिलिंद दादांचं रानबखर वाचायला घेतलं. रानबखर म्हणजे काही इतिहास नाही. ते स्वतः रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली म्हणून ही रानबखर. सुरवातीला ओळख अतिशय छान करून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी पट्टा सहज नजरेसमोर येतो. मुंबई सोडून जव्हार सारख्या ठिकाणी दादांचा १९९९ साली सुरू झालेला प्रवास. तिथल्या गावांत त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे. आदिवासींचे सुखदुःखाचे क्षण, तिथली संस्कृती, आदिवासी बांधवांनी मिलिंद दादाचा केलेला पाहुणचार, आदिवासींचा चांगुलपणा असं बरंच काही या बखरीत दिलं आहे. धुळे जिल्ह्यातील बारीपाड्याचे चैत्राम पवार यांनी गावात केलेला बदल, नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाजवळ वाघाड धरणावर शेतकऱ्यांनी केलेला व्यवस्थापन प्रयोग, मेंढालेखाचे 'आम्ही सरकार' या अभिनव प्रयोगांची माहिती दिली आहे.
![]() |
| रानबखर |
जावळ्याहेद गावातील वसंताने बिबट्याला दिलेला चकवा, सरकारी नोकरी मिळावी म्हणून त्यासाठी मोजावा लागणारा पैसा हे काही पटण्यासारखे नाही म्हणून गावातच काहीतरी करून स्वतःला स्वावलंबी करणारा फत्तेसिंग अशा अनेक मित्रांच्या कहाण्या या पुस्तकात आहेत. सातपुड्याजवळील पुतीपाड्याच्या लोकांनी दाखवलेली चतूरता, वनविभागाने गढताल गावाकडे केलेलं दुर्लक्ष असे काही प्रसंगही यात नमूद केलेले आहेत. नक्षलवाद अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. उत्तरांच्या शोधाकडे येताना सामंजस्य पद्धतीने लोकांना कसे विश्वासात घेऊन विकासकामे करता येईल यावर प्रकाश टाकला आहे. विकास प्रत्येकाला हवा असतो पण त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे आणि विकासकामांच्या कोणी आड येत असेल किंवा काही समस्यां असेल तर समजुतीने त्या दूर झाल्या पाहिजेत.
पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं पण त्यात कायमस्वरूपी न अडकता विविध शिबिरातून अभ्यासून अनुभव घेऊन आदिवासी बांधवांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने मिलिंद दादा जव्हारला आले आणि 'वयम'सारखी एक मोठी चळवळ उभी केली. मागील वर्षी आमची भेट झालेली त्यावेळी त्यांनी 'रानबखर' हे पुस्तक भेट दिलेलं.
रानबखर - मिलिंद थत्ते
समकालीन प्रकाशन
- शैलेश दिनकर पाटील

Massta
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हटवा