कोरोना आणि जागरूक समाज


कोरोना आपत्तीमुळे देशांतील शहरांचा आणि गावांचा कारभार बंद झाला होता. अजूनही काही ठिकाणी कडकडीत बंद आहे. या बंदच्या वातावरणात रोजंदारीवर काम करणारा वर्ग सुद्धा अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीला पाच-सहा दिवस भागले गेले पण त्यांनंतर जाणवू लागली ती आर्थिक चणचण. दररोज पोटापाण्यासाठी लागणारा किराणा आणायचा कोठून? त्यासाठी पैसे उभारायचे कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. देशभरातील विविध गावांत-शहरांत काही सामाजिक संस्था आपुलकीने काम करत आहेत. माझा शाळकरी मित्र अमोल पाटील. तो आणि त्याचा मित्र महेश एगडे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सतत चौऱ्यांशी दिवस कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, जळगाव, मनमाड, टिटवाळा, सिल्वासा येथील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले आहे. ज्यांना मदत केली आहे ते सारे रोजंदारीवर काम करणारे कुटुंब आहेत. त्यात काही मध्यमवर्गीय देखील आहेत. प्रत्येक कुटुंबाला आठ-दहा दिवस पुरेल इतके किराणा साहित्य देणे सुरू होते. कोठलीही संस्था सोबतीला नाही. मदत करायची म्हणून प्रामाणिकपणे अजूनही काम सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी एक हजार कुटुंबांपर्यंत किराणा पोहोचवला आहे.

 किराणा साहित्याचे किट

अमोल आणि महेश २०१६ पासून गरजू संस्थांना मदत करण्याचे काम करत आहेत. बऱ्याचदा समाजाविषयी जाण असते पण मैदानी पातळीवर काम करण्यासाठी नेमके कसे जावे हा प्रश्न कायम पडतो. हाच प्रश्न अमोलला सतावत होता. टिटवाळा येथील कराटेमध्ये नावाजलेली व्यक्ती विनायक कोळी. त्यांचा टिटवाळ्याला कराटे क्लास आहे. अमोल त्यांचाच विद्यार्थी. विनायक आणि त्यांची टीम एका आदिवासी पाड्यातील शाळेत उपक्रमासाठी जाणार होते आणि नेमकी एक माणसाची आवश्यकता त्यांना भासणार होती. त्यावेळी त्यांनी अमोलला विचारले आणि त्याने पटकन होकार कळवला. विनायक यांच्या टीमसोबत अमोल देखील होता. पाड्यातल्या त्या शाळेत गेल्यावर तिथल्या शिक्षकांनी शाळा आणि पाड्याची परिस्थिती सांगितली. तिथली परिस्थिती पाहून अमोलला वाटत होते की आपणही काहीतरी करायला हवे. अमोलचा सोबती महेश हा त्याचा शेजारी. पण त्यांची चांगली गट्टी झाली ती व्यायामशाळेत. महेशची टिटवाळामध्ये स्वतःची व्यायामशाळा आहे. तो मूळचा टिटवाळ्याचाच. दोघांची चांगली मैत्री झाली होती अमोलने त्याचे विचार महेशजवळ मांडले आणि त्यालाही ते मनोमन पटले. आणि तेथून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. सुरवातीला त्यांनी राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक-दोन कार्यक्रमही केले. पण काही कारणांमुळे दोघेही तेथून बाहेर पडले. संस्था सुरू न करता आपल्याला मैदानी पातळीवर जे जे करता येईल ते आपण करूयात असे दोघांनी ठरवले.

विविध ठिकाणी वाटप करतांना

२०१७ साली टिटवाळा येथील अंकुर संस्थेशी त्यांचा संपर्क आला. अंकुर संस्था निराधार मुलांसाठी काम करते. या संस्थेतील मुलांसाठी खाऊ वाटप किंवा वाढदिवस साजरा करणं असे विविध उपक्रम येथे करत असतात. मुलांमध्ये राहून उपक्रमशील खेळ घेत असतात. यावर्षीचा पावसाळा सुरू होण्याआधी त्यांनी संस्थेच्या प्रत्येक मुलाला सँडेल वाटप केले. टिटवाळा नजीकच म्हसकळ येथील 'जीवन संवर्धन' आणि गुरवली फाटा येथील 'आईची सावली' या दोन्ही संस्थांना लॉकडाऊनच्या दरम्यान तातडीने मदत हवी होती ती मदत या दोघांनी केली. 'जीवन संवर्धन' आणि 'आईची सावली' या दोन्ही संस्था लहान मुलांसाठी काम करतात. रेड लाईट विभागातील महिलांच्या बाळांचा सांभाळ 'आईची सावली' ही संस्था करते.
अंकुर सेवा ट्रस्ट येथे सँडेल वाटप करताना

लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसाठी अमोल आणि महेशने सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत वीस जणांनी १००-५००-१००० अशा रुपयांची मदत केली. एकूण पंधरा हजार रुपये त्यांच्याकडे जमले होते. ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांचे पैसे कोठे खर्च झाले? आणि कोणत्या ठिकाणी साहित्य पोचवले याची एक पावती मदत करणाऱ्या व्यक्तींना पाठवतात. आता बऱ्याचदा दूरच्या ठिकाणी या दोघांना जाता येत नाही. मग तिथल्या मित्रांना संपर्क करून त्यांच्यापर्यंत मदत पोचवायला सांगतात. किराणासाठी त्यांनी टिटवाळ्याचाच एक विश्वासू दुकानदार पाहून ठेवला आहे. महिनाभर त्याच्याकडे उधार घ्यायचं सगळा खर्च टिपून ठेवायचा आणि मग तसे पैसे द्यायचे.
अमोल आणि महेश 


महेेश स्वतः व्यायामशाळेव्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनचे काम पाहतो. त्याचे फार्म हाऊस देखील आहे. त्याच्या फार्महाऊसवर किराणा साहित्याच्या किटची पॅकिंग करतात. त्यासाठी त्यांनी एक माणूसही नेमून ठेवला आहे. त्याला मानधन देखील देतात. ज्या ठिकाणी मदत पोचवणार आहे तिथली आधी पाहणी करतात मगच तेथे मदत पोचवतात. महेश आणि अमोल दोघेही स्वतःकडील पैसे खर्च करून काम करत आहेत. अमोल मध्यमवर्गीय घरातलाच. तो ऍटोस ग्लोबल या आयटी कंपनीत नोकरीला आहे. त्याने स्वतःच्या एलआयसी पॉलिसीतले जमा असलेले दीड लाख रुपये या कामासाठी काढले त्यातले ऐंशी हजार रुपये खर्च झाले आहेत तर महेशने त्याच्याकडील सोने गहाण ठेऊन नव्वद हजार रुपयांची मदत या उपक्रमासाठी केली आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. अमोलच्या एका मित्राने त्याला विचारलं, की तुम्ही किती दिवस अशी मदत करत राहणार? त्यावर त्याने उत्तर दिलं, की जेव्हा आमच्याकडे पैसे संपतील आणि आमच्यावर आता फार कर्ज झाले आहे असे वाटेल त्यावेळी आम्ही काम थांबवू. आणखी काही वेगळ्यापद्धतीने पण योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्नही करू. या दोघांनी आरंभिलेले हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.

- शैलेश दिनकर पाटील
९६७३५७३१४८

टिप्पण्या

  1. खूप छान,शैलेशदादा. आपल्या देशात, शहरात असे खूप लोक ,आपल्या पद्धतीने समाजकार्य करत असतात.पण सोशल नेटवर्कर किव्हा मीडियावर जे दाखवतात त्यांचीच ओळख आपल्याला होते. तू हा ब्लॉग लिहिला म्हणून या अवलियांची आम्हाला ओळख झाली. त्यांच्या या कार्यात आम्हाला काही मदत करता आली तर नक्की करूया. आणि यांना त्यांनी हातात घेतलेल्या कार्यात अजून यश प्राप्त होऊदे ही सदिच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय छान नि कौतुकास्पद कार्य, वंदन!

    उत्तर द्याहटवा
  3. Koni dyala lagal tar koni tar karn pan banun jato aaplya kade kay aahe tya pekshya kay deu sakato ashe he 2 great person solute aahe tyanha khup himat lagate ase decision ghetana

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"