एक दिवस श्रमदानाचा

महाराष्ट्रातल्या गावांत जाऊन तेथल्या माणसांसारखी मेहनत करायची. फावडे, कुदळ घेऊन त्यांच्यासोबत एक दिवसासाठी श्रमदान मोहिमेसाठी जायचं. हे सगळं गेले दोन वर्षांपासून वेगवेगळ्या गावांत जाऊन अनुभव घेतोय. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एखाद्या गावात श्रमदानासाठी वेळ द्यायचा. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही संधी हुकली. मागील वर्षाचा अनुभव खूप चांगला होता. सोशल मीडियावर पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाविषयी माहिती समजली होती. विकास, परमेश्वर, दीपक आणि मी आम्ही चौघांनी पाणी फाउंडेशनच्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी केली. जवळचे ठिकाण हवे म्हणून नाशिकमधला सिन्नर तालुका निवडला. महाश्रमदानाच्या दोन दिवसांआधी गावाचे नाव मॅसेजद्वारे कळवण्यात आले. ३० एप्रिलच्या संध्याकाळी निघालो.सिन्नर तालुक्यातील मेंढी गावच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राला (https://sdpmarma.blogspot.com/2020/04/blog-post_25.html) भेट दिल्यानंतर आम्ही पहाटे महाश्रमदानासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावी जायला निघालो. वडझिरे गावातील श्रमदानासाठी किरण भावसार आणि त्यांचे सोबतीदेखील येणार होते. किरण भावसार हे उत्तम कवी. सिन्नरला येण्यापूर्वी त्यांना कल्पना दिलेली त्यांनी तेथे पोहोचल्यापासून शेवटपर्यंत उत्तम सहकार्य केले. भावसार यांच्या घरी चहा घेतला आणि तेथून आम्ही आमच्या कामाला निघालो.



कवी आणि रसिक मंडळी एकत्र आले तर काय होतं हे त्या दिवशी अनुभवायला मिळालं. भावसार यांच्या घरून निघालो गाडीत गप्पा सुरु झाल्या. विकास छान कविता करतो. त्याची आणि भावसारांची काव्य मैफिल रंगली. विकासने 'ती'च्या खळीवर आणि तिरंगावर तर किरण भावसार यांनी गावच्या परिस्थितीवर कविता सादर केली. आम्ही रसिक मात्र वाह वाह दाद देत आनंद लुटत होतो. अर्धा तास कविता एके कविताच. गप्पा मारता मारता कधी वडझिरे गावात पोहोचलो कळलेच नाही. तेथील दृश्य पाहता फार हायसे वाटले. खूप साऱ्या मोठ-मोठ्या गाड्या. नागपूर, मुंबई, सोलापूर अशा दूर ठिकाणांहून आलेली ही माणसं. खरं तर ही सगळी मंडळी हे काम अनुभवायला आली होती. काहीजण आमच्यासारखेच नवखे होते तर काहीजण चार वर्षांपासून महाश्रमदान शिबिराशी जोडले गेलेले होते आणि काहीतर व्रतस्थ जिथे पाणी फाउंडेशन तिथे आम्ही. गाडी पार्क केल्यानंतर नावनोंदणी केली आणि पुढे गावकरी स्वागतासाठीच उभे होते. टिळा लावून स्वागत केले. येथूनच गाव संस्कृतीचे दर्शन घडते होते. दहा-दहां माणसांचे गट करून त्यांना कामाचे ठिकाण देणार होते. मला त्यांच्या कामाची कल्पना आवडली. जेथे काम करावयाचे आहे त्याठिकाणी दिलेल्या प्रत्येक जागेसाठी गडाच्या नावांच्या चिठ्ठ्या केल्या होत्या. त्यातली एक चिठ्ठी आम्हाला दिली त्यावर नाव होतं सज्जनगड. नाव ऐकूनच काम करण्याचे स्फुरण चढले. फावडा, कुदळ, घमेले हातात घेतले आणि दिलेल्या कामाच्या ठिकाणी गेलो. साधारण अंदाजे दहा-पंधरा मीटर पट्ट्याची जागा असेल ती एक फूट खोदायची होती आणि खोदून निघालेली माती बाजूला टाकून त्याची उंची(बांध पद्धतीत) पंच्याहत्तर सेंटीमीटर उभी करायची होती. कामाला जोरदार सुरवात केली पण कुदळचे पाच-सहा फटके मारताच गार झालो. जाणीव झाली. शेतकरी बांधव किती मेहनतीने पिकवतो आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं. पण त्या मागची मेहनत खूप आहे. दिलेलं काम तर पूर्ण करायचंच होतं. कामाशी एकरूप होऊन दीड तासांत ते आटोपलं.

सिन्नरचे दिलखुलास माणसं आणि आम्ही

हाश्रमदानासाठी जवळपास दोन हजारपेक्षा अधिक माणसे आलेली होती. ही संख्या फक्त वडझिरे गावातली असे महाश्रमदान तर महाराष्ट्रभर सुरूच होते. कितीतरी माणसं स्वतःचा वेळ खर्च करून येथे आले होते. खूप छान वाटले. नाशिक, सिन्नर इथल्या काही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही श्रमदानासाठी सहभाग नोंदवला होता. किरण भावसार यांनी त्यांच्या कंपनीतल्या मित्रांशी ओळख करून दिली. मराठी मालिकांमधील कलाकारांनी देखील श्रमदानाला हजेरी लावली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका(अनिता दाते) आणि तिचे काही सहकलाकार आले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांना भेटी देत होते. सकाळी दहापर्यंत महाश्रमदानाची वेळ होती तरी लोकं अकरा वाजेपर्यंत काम करत होते. महाश्रमदानासाठी आलेल्या लोकांसाठी गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. गावातल्या एका मोकळ्या मैदानात एक मांडव टाकला होता. तेथे कीर्तन सुरू होते. काही जण पाण्याविषयीचे महत्व सांगत होते. राजस्थानवरून एक महिला आली होती. त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या. तोडक्या मोडक्या मराठीत त्यांनी सुरवात केली. पुढे त्या म्हणाल्या इकडे आल्यावर आपलेपणाची भावना निर्माण झाली. हे जे वाक्य होत फार पटलं इथे प्रत्येक जण एकत्र येऊन काम करत होता. कोठेही मोठेपणाचा आव नाही. श्रमदान करायचं आणि या गावात पाणी आणायचं आहे. याच भावनेनं सगळे काम करत होते. एकंदर खूप मज्जा आली चांगला अनुभव मिळाला वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी झाल्या. माघारी निघताना तिथल्या पोस्टरकडे लक्ष गेलं. आणि संध्याकाळच्या सत्रात आमिर खान, सत्यजित भटकळ येणार आहेत हे कळलं. या दोन्ही व्यक्तींनी श्रमदानासाठी जी चळवळ चालवली आहे. खरंच कमाल आहे. यावर्षी कोरोना आपत्तीमुळे सगळंच थांबलं.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"