"रंगारी अन कलाकारी".. - मधुकर दळवी
तलासरी तालुक्याच्या उधवा रस्त्यालगत असलेल्या कासपाडा गावात मधुकर दळवी हे बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तू बनवतात त्यांची माहिती विनेश सरांकडून समजली. विनेश सर, मी आणि दिनेश सर त्यांची कलाकुसर पाहण्यासाठी दळवी यांच्या घरी गेलो होतो. कासपाडा आश्रमशाळेच्या समोर एक छोटंसं मातीचं घर आहे. घराच्या बाहेर बाईक लावून आत शिरलो तर दरवाज्याच्या बाहेर मधुकर पेंटर असा फलक लावलेला दिसला. त्यांच्या घरात शिरलो तर दोन्ही भिंतीवर त्यांनी काढलेली चित्र लावलेली होती. जवळपास पन्नासेक चित्र असावीत. ते सगळं पाहून सुखावलो. मधुकर दळवी मधुकर दळवींचा जन्म कासपाड्यातलाच. त्यांचं वय वर्ष त्रेचाळीस. पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. दळवी यांचे शालेय शिक्षण कासपाड्यातच झाले. शिक्षण फारसं नसल्यामुळे नोकरी नाही. शेतीवर उदरनिर्वाह करावा लागायचा. पण स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून त्यांनी शाळा आणि इमारतीच्या भिंती रंगवण्याचे काम २०१० साली हाती घेतले. दळवींचं अक्षर चांगलं होतं. रंगकाम करत असताना ते थोडंफार ब्रशने लिहिण्याचा प्रयत्न करायचे. आणि तो प्रयत्न यशस्वी व्हायचा. त्यांच्या गावातल...