खान्देशातील लोकपरंपरा 'वन'
जसे कोकणात 'दशावतार', विदर्भात 'सोंग', आदिवासी भागात 'बोहाडा' त्याचप्रकारे जळगाव जिल्ह्यात 'वहन' ही लोकपरंपरा जपली जाते. चोपडा तालुक्यातील हातेड गावात 'वहन' लोकपरंपरा एक वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. अहिराणी भाषेत 'वहन' शब्दाचा अपभ्रंश होऊन 'वन' या शब्दानेच ही लोककला प्रचलित आहे. जळगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हातेड गाव आहे. या गावातील एकूण लोकवस्ती चार हजार पाचशे. 'वन' ही लोककला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पन्नास वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावात अगदी नियमितपणे सुरू आहे. २००७ सालानंतर या लोककलेत काही कारणांमुळे दोन वर्ष खंड पडला होता. गावातल्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्यावर विचार केला, की पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण जपली पाहिजे या हेतूने गावातले लोकं उत्साहाने पुढे आले. २००९ पासून ते आतापर्यंत या लोककलेचे सादरीकरण उत्तमपणे होत आहे. लोककलेत कलाकार मंडळी 'रामलीला' सादर करतात. गावातल्या श्रीराम मंदिरासमोरच त्याचे सादरीकरण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणाऱ्या रामलीलाचा कालावधी पाच...