सक्षम गाव डोयापाडा!
सृजन यात्रा सुरू होण्याआधी 'वयम्' चळवळीचे विनायक दादा यांना डोयापाडा गावच्या भेटीविषयी सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले आणि डोयापाडा येथील रघु दादाचा मोबाईल नंबर दिला. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड येथे 'वयम् चळवळ' काम करते. चळवळीचे मुख्य कार्यालय जव्हार येथे आहे. २०२० साली महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा गावात भेट देण्यासाठी आले होते अशी बातमी वृत्तपत्र आणि टीव्हीवरील न्यूज चॅनलवर झळकली होती. आता राज्यपाल त्या गावात भेट देण्यासाठी आले म्हणजे त्या गावाने काहीतरी चांगलं काम केलंच असणार. म्हणून त्या गावभेटीचे नियोजन ठरले. गावात ग्रामसभा भरवली होती. गावातले इतर मुद्द्यांसोबत सृजन यात्रेकरू भेट द्यायला येणार आहेत हा मुद्दा देखील निघाला. बाहेरची माणसं गाव पाहायला येणार म्हणून सगळ्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रकाश बरफ आणि रघु यांच्या बरोबर बोलल्यानंतर आमची भेट ठरली. फांगणे येथील आजीबाईंची शाळा बघून झाल्यावर आम्ही डोयापाडाच्या मार्गी निघालो. तीन तासांचा हा प्रवास होता. दुपारी दीडच्या दरम्यान गावात पोहोचलो. सृजन यात्रेदर...