चालतं फिरतं ग्रंथालय
वाचन संस्कृती रुजावी म्हणून काही वाचनालय किंवा संस्था विविध मार्गाने प्रयत्न करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न बारामती येथील बेचाळीस वर्षीय राजेंद्र सुमंत करत आहेत. मागील सोळा वर्षांपासून(२००६) वाचकांसाठी पुस्तकं घरपोच पोचविण्याची सेवा देत आहेत. राजेंद्र सुमंत यांनी वाई येथील किसन वीर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना साहित्य क्षेत्र आणि वाचनाची गोडी लागली. ते वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे १९९९ साली सभासद झाले. तेथे त्यांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात दुरून येणारे वाचक, तेथील व्यवस्था हे सारे त्यांच्या नजरेखालून जात होते. त्याच दरम्यान त्यांना वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली. पण त्याचे नियोजन कसे करता येईल? या विचारांतच दोन-तीन वर्षांचा कालावधी गेला. राजेंद्र सुमंत घरगुती वाचनालय सुरू केल्यावर वाचक तेथपर्यंत पोचेल की नाही या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी पुस्तक घरपोच देण्याचा विचार केला. या निमित्ताने त्यांचा जनसंपर्कदेखील वाढणार होता. ०१ जानेवारी २००६ रोजी 'साहित्य संस्कृती' या नावाने ग्रंथालय' सुरू केले. त...