एक दिवस श्रमदानाचा
महाराष्ट्रातल्या गावांत जाऊन तेथल्या माणसांसारखी मेहनत करायची. फावडे, कुदळ घेऊन त्यांच्यासोबत एक दिवसासाठी श्रमदान मोहिमेसाठी जायचं. हे सगळं गेले दोन वर्षांपासून वेगवेगळ्या गावांत जाऊन अनुभव घेतोय. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एखाद्या गावात श्रमदानासाठी वेळ द्यायचा. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही संधी हुकली. मागील वर्षाचा अनुभव खूप चांगला होता. सोशल मीडियावर पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाविषयी माहिती समजली होती. विकास, परमेश्वर, दीपक आणि मी आम्ही चौघांनी पाणी फाउंडेशनच्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी केली. जवळचे ठिकाण हवे म्हणून नाशिकमधला सिन्नर तालुका निवडला. महाश्रमदानाच्या दोन दिवसांआधी गावाचे नाव मॅसेजद्वारे कळवण्यात आले. ३० एप्रिलच्या संध्याकाळी निघालो.सिन्नर तालुक्यातील मेंढी गावच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राला ( https://sdpmarma.blogspot.com/2020/04/blog-post_25.html ) भेट दिल्यानंतर आम्ही पहाटे महाश्रमदानासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावी जायला निघालो. वडझिरे गावातील श्रमदानासाठी किरण भावसार आणि त्यांचे सोबतीदेखील येणार होते. किरण भावसार हे उत्तम कवी. सिन्नरला येण्यापूर्वी त्यांना कल्पन...